Wednesday, April 20, 2011

बोलण्याची झिंग...

संध्याकाळची वेळ… घरामध्ये आईच्या लिंबू टिंबू स्टुडंटस् चा चाललेला अतिशय कटकटी क्लास, आणि जीव मेटीकुटीला आणणारा उकाडा......आधीच चुकीच्या वेळी झोप काढल्यामुळे जाम चिवचिव होत होती, त्यात मासाहेब या रम्य वातावरणात त्यांच्या एका प्रिय मैत्रिणीला माझ्या हवाली ( का मला तिच्या हवाली??? ) करून स्वत: भलतीकडेच पसार झाल्या होत्या. आता ही मैत्रीण , म्हणजे मावशी , खूssssssssssप चांगली आहे.. पण ती अ ति श य बोलते....म्हणजे अअअअअ तिsssss शssss यssssss...
मी उठल्या पासून, तिने जी प्रश्नांचा सरबत्ती, ससेमिरा वगैरे वगैरे चालू केला, तो संपायचं नावच घेईना, म्हणजे आईचे गात असलेले विद्यार्थी, ते थेट सा रे ग म प मधली मुलं, तिच्या मुलाच्या मुलाचं बारसं ते तिचं परतीचं तिकिट.. अशा असंख्य विषयांवर तिचं जाहीर मंथन चालू होतं, आणि माझ्या नुकत्याच सुप्तावस्थेतून उठलेल्या मेंदूला काही ते झेपेना.. अखेर हा सिलसिला थांवबण्यासाठी मी मावशीला घेऊन वरळी सी फेसला निघाले...
हुश्श्....... त्यातल्या त्यात हलणारा वारा..... आणि बडबडीला क्षणभर विश्रांती..........
पण हाय रे दैवा !! सी फेस वरनं यू टर्न घेतला अन् काय... पुन्हा प्रश्नावली सुरू ! आणि मावश्यांच्या प्रश्नांची उत्तरं तशीही आपल्याला कुठे माहिती असतात??!! अखेर माझ्या सहनशीलतेचा अंत आणि कटकटीचा कडेलोट झाल्यावर , मी अत्यंत कळकळीने माझ्या फोनवरून गुगलला एक प्रश्न टाकला.. “ का बाबा क्का ????? बायका इतकं का बोलतात???? Why do women talk so much? “

क्षणार्धात गुगलने अपेक्षेप्रमाणे खंडीभर रिझल्टस् दिले...’ Women who talk much”, “ Do women really talk more?’, Why do women talk more?’ अशा अनेक रिझल्टस् बरोबर एका रिझल्टने माझं लक्ष वेधून घेतलं... एका रिसर्चच्या मते, “women talk 3 times as much as men!”, हो! सगळ्या मानवजातीला ज्याची आधीच खात्री होती, त्यावर शिक्कामोर्तब करणारा रिसर्च Dr Luan Brizendine नावाच्या psychiatrist ने 2006 मध्ये केलाय.
( तिने यासंबंधी पुस्तकही लिहिलंय...)

तर या रिसर्चच्या मते बायका दिवसाला जवळपास 20000 शब्द बोलतात, पुरूषांपेक्षा 13000 शब्द जास्त! शिवाय... बायका पुरूषांपेक्षा जास्त चपळाईने बोलतात, आणि त्यासाठी मेंदूची शक्ती जास्त वापरतात .स्त्री आणि पुरूषांच्या मेंदूतच मुलभूत फरक असल्याले ही तफावत आहे... किंबहुना बोलण्यामुळे बायकांच्या मेंदूत काही अशी केमिकल्स सिक्रीट होतात, ज्यामुळे त्यांना हेरॉईनसारखं ड्रग घेण्याइतपत झिंग येते.
( कदाचित म्हणूनच बायकांना सिगरेट, दारू , तंबाखू, गांजाची गरज तुलनेने कमी पडत असावी ! – हा माझा रिसर्च ;) )

पुढे ऐका.. रिसर्चच्या मते या सगऴ्याची सुरूवात बाळ आईच्या पोटात असतानाच होते. जर मुलगा असेल, तर टेस्ट्रोस्ट्रोनमुळे मुलाच्या मेंदूची वाढ वेगळी होते आणि संवाद , संवेदनशीलता आणि स्मरणशक्ती यांची परिमाणं मुलीपेक्षा वेगळी असतात ( कमाल आहे, इथेही टेस्ट्रोस्ट्रोन??). याचा परिणाम असा की, यामुळे स्त्रियांपेक्षा आपल्या भावना व्यक्त करताना पुरूष नेहमीच कमी पडतात. ( अजून एका खात्रीच्या संशयावर शास्त्रीय शिक्कामोर्तब!)
म्हणजे बायकांच्या इमोशन्सचं संक्रमण आठपदरी महामार्गावर होत असताना, पुरूषांच्या इमोशन्सना मात्र व्यक्त होण्यासाठी गल्लीएवढीच वाट मिळते.
पण असं असतानाच बायकांच्या बडबडीकडे साफ दुर्लक्ष करण्याची सोयही पुरुषांना टेस्ट्रोस्ट्रोनने करून दिलीय. ( थोडक्यात बायको, गर्लफ्रेंड, आई ,बहीण यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं यांच्या रक्तातच आहे तर...मग बायका लॉजिकली बोलत असल्या तरी!)

अर्थात बडबड न करण्यात, भावना व्यक्त न करण्यात जी प्रचंड ब्रेनपॉवर पुरूष वाचवतात, त्याचा सदुपयोग ते सेक्स बद्द्ल विचार करण्यासाठी करतात. सामान्यत: पुरूषांच्या मेंदूत दर 52 सेकंदांनी सेक्सचा विचार येतो, तर बायकांना दिवसातून एकदाच सेक्सची आठवण येते. ( इति रिसर्च!) आहेत की नाहीत मेड फॉर ईच अदर…..????

असो... एकंदरित या रिसर्चने अनेक गोष्टींची फेरतपासणी केली असली तरी त्यावर इतर तज्ञांची वेगळी मतं आहेतच, पण ती फक्त “बायका जास्त का बोलतात?” यावर आहेत, “बायका जास्त बोलतात का?” यावर नाहीत!!!

अर्थात कितीही नाही म्हटलं तरी मावशीच्या बडबडीने आईला वर्षभरात न जमलेली गोष्ट साध्य केली. माझ्या ब्लॉगचा श्रीगणेशा करण्याची! चला तर मग....आधी अजाणतेपणी अनुभवलेली बोलण्याची झिंग, आता हक्काने अनुभवायला काहीच हरकत नाही. 

10 comments:

  1. ब्लॉग छान लिहलाय, पुढचा ब्लॉग गुगलमध्ये पुढील विषयांवर सर्च करून लिह, १) अवेळी झोप घेतल्यानं वैतागून बायकांच्या मनात काय-काय विचार येतात, २) लग्नाआधी घरात मुलांचा वावर वाढल्यानं बायका लहान मुलांना कंटाळतात का?, 3) बायकांना बायकांचं निरीक्षण करायला किती आवडतं, ५) किती टक्के महिला महिलांचं निरीक्षण केल्यानंतर त्या विषयाची तुलना पुरूषांशी करतात...

    ReplyDelete
  2. hey sahi aahe ha lekh... keep it up dear.........mastach.....

    ReplyDelete
  3. hey hii sahii lehala aahe masta keep it up :)

    ReplyDelete
  4. wow.. gr8... poorvi.!!. khoop bhari!!

    ReplyDelete
  5. jaywant patil tuzya pratyek goshticha kautuk ka karto he pan google var shodhayla survaat kar. Uttar nahi sapadla tar mala kiva MAJHA madhlya konalahi vichaar

    ReplyDelete
  6. श्रीरंग त्याचं उत्तर तिला माहित आहे, म्हणून तिच्याकडे उत्तर नाही

    ReplyDelete
  7. खूपच छान पूर्वी.. बडबडीच्या निमित्तानं तू रिसर्चद्वारे बाहेर येणारी आणि शास्त्रीय माहिती सुद्धा दिलीस.. त्याबद्दल धन्यवाद!
    त्यातच तुझी लिखाणाची धाटणीही उत्तम आहे हे सुद्धा अधोरेखीत केलंस... खरोखरीच श्रीगणेशा उत्तम झालाय...
    All the very very Best!!!
    लिहिती राहा

    ReplyDelete
  8. खूपच मस्त blog आहे.. असच छान छान लिहित राहा..

    ReplyDelete
  9. chan chan chan amchi poorvi kiti chan

    ReplyDelete